सावंतवाडी
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो नव्हे ती आपली जबाबदारी आहे, या सामाजिक जाणिवेतून समाजात अनेक संस्था कार्यरत आहेत. “मानव सेवा, हीच ईश्वर सेवा” या भावनेतूनच या समाजसेवी संस्था सर्वत्र कार्य करत असतात. अशाच स्वयंसेवी संस्थापैकी मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेच्यावतीने रोणापाल येथील दयासागर वस्तीगृहास वर्षभर पुरेल अशा सुमारे २ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यात धान्यासह किराणा मालाचा समावेश आहे. या सेवाभावी संस्थेच्यावतीने गेल्या दोन वर्षांपासून असे उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. गेल्यावर्षीही या संस्थेच्यावतीने या वस्तीगृहासह कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील शोषित मुक्ती अभियान संस्था संचालित नाग्या महादू कातकरी वस्तीगृहालाही जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले होते. तसेच सावंतवाडीच्या आयुर्वेद महाविद्यालयालाही सुमारे ३.५० लाख रुपयांचे साहित्य देण्यात आले होते. या संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक मास्टर चोआ कॉक सुई यांच्या नावे फिरते वैद्यकीय पथक सह्याद्री पट्ट्यात सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभरापासून कार्यरत आहे. समाजातील खऱ्याखुऱ्या गरजवंतांचा शोध घेऊन ही मदत करण्यात येत असल्यामुळे या संस्थेची ही मदत खऱ्या अर्थाने सार्थकी लागते. यापुढेही जिल्हयात गरजवंत समाजासाठी विविध उपक्रम राबविण्याचा या संस्थेचा मानस आहे.







