
कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग मंडळात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; जिल्ह्यात साहित्यिक उपक्रमांना अधिक गती देण्याचा निर्धार
सावंतवाडी प्रतिनिधी :
“कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग मंडळाचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. जिल्ह्यातील साहित्य चळवळ अधिक प्रभावीपणे आणि व्यापक स्वरूपात राबवा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही मला दिलेल्या शुभेच्छा ही माझ्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्गवासीयांकडून मिळालेली अमूल्य भेट आहे,” असे भावपूर्ण उद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी काढले.
कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक बुधवारी सावंतवाडी येथील पर्णकुटी विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना ऑनलाइन गुरुवंदना अर्पण करण्यात आली.
ऑनलाइन संवादात कर्णिक यांनी सांगितले की, सिंधुदुर्गात मराठी साहित्य चळवळ वेगाने पुढे जात आहे. ही चळवळ अधिक प्रगल्भ करण्यासाठी सातत्याने साहित्यिक आणि मराठी भाषा संवर्धनाचे उपक्रम राबवावेत. “तुम्हा सर्वांना माझे मनःपूर्वक आशीर्वाद आहेत. मराठी भाषा आणि साहित्याच्या जतनासाठी अविरत कार्य करत राहा,” असा संदेश त्यांनी दिला.
यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी सांगितले की, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर्जेदार कार्य सुरू असून शासन स्तरावरही संस्थेच्या उपक्रमांची दखल घेतली जात आहे. अमराठी बांधवांना मराठी भाषा शिकविण्याचा उपक्रम यशस्वीपणे सुरू असून त्याचा समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाणे येथे होणार आहे. तसेच लवकरच कोकणात राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीत ग्रंथमित्र पुरस्कार विजेते, जिल्हा खजिनदार आणि ज्येष्ठ साहित्यप्रेमी आनंद वैद्य तसेच जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने तयार केलेल्या पाईप क्लिन्झर पुष्पगुच्छाने विशेष सत्कार करण्यात आला.
बैठकीत प्रांतिक सदस्य रुजारी ओ. पिंटो, जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, मालवण तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर, कुडाळ तालुकाध्यक्ष संतोष वालावलकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक पटेकर, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव राजू तावडे, सहसचिव सुरेश पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहसचिव सुरेश पवार यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के म्हणाले, “पद्मश्री मधु मंगेश कर्णिक हे आमचे गुरुवर्य असून त्यांच्या प्रेरणेतूनच कोकण मराठी साहित्य परिषदेची चळवळ आज व्यापक स्वरूपात पुढे जात आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांचे आशीर्वाद मिळणे ही आमच्यासाठी प्रेरणादायी बाब आहे.”
बैठकीत जिल्ह्यातील साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन लवकरच कुडाळ येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन, विविध साहित्यिक उपक्रम, दोडामार्ग, वेंगुर्ले व देवगड शाखांचे पुनरुज्जीवन, तसेच अधिकाधिक नवीन सभासद नोंदणी करून परिषदेची व्याप्ती वाढविण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बैठकीचे अहवाल वाचन जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत यांनी केले. यावेळी विशेष आकर्षण ठरलेल्या आगळ्यावेगळ्या पाईप क्लिन्झर पुष्पगुच्छाची निर्मिती करणाऱ्या काव्या सावंत हिचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.







