ठळक घडामोडी

सावंतवाडीत ९ सप्टेंबरला भाजपची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती; ४०० हून अधिक पदाधिकारी सहभागी होणार

सावंतवाडी, ता. ५ : भारतीय जनता पक्षाची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक येत्या ९ सप्टेंबर रोजी सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील ४०० हून अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नुकतीच पुणे येथे भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीला चार हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्याच धर्तीवर सावंतवाडीत होणाऱ्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीलाही मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार प्रमोद जठार, अतुल काळसेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडळ कार्यकारिणी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

बैठकीदरम्यान केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विविध विकासकामांबद्दल अभिनंदन ठराव मंजूर करण्यात येणार आहे. त्यानंतर पक्षाचा राजकीय प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे प्रभाकर सावंत यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा २५ वर्षांचा राजकीय प्रवास पूर्ण केल्याच्या निमित्ताने भाजपकडून ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून, या अभियानाचे सविस्तर नियोजन जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेला भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सहकार आघाडी जिल्हा संयोजक रवि मडगावकर, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, तालुका मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, वेंगुर्ले तालुका मंडळ अध्यक्ष पप्पू परब, शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, माजी सभापती पंकज पेडणेकर, पंचायत समिती सदस्य महेश धुरी, दिलीप भालेकर, सागर ढोकरे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.