वसुंधरेचे ऋण फेडूया, पर्यावरणाचे रक्षण करूया …
संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘राष्ट्रीय भूगोल दिन’ उत्साहात साजरा.
सावंतवाडी
संस्कार नॅशनल स्कूलमध्ये बुधवार दिनांक १४ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय भूगोल दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. थोर खगोलशास्त्रज्ञ व भूगोलतज्ज्ञ डॉ. सी. डी. देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्त आणि मकर संक्रांतीचे भौगोलिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सी. डी. देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध भौगोलिक प्रतिकृती, नकाशे आणि तक्त्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या भौगोलिक प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. शेखर जैन सर यांनी केले. यामध्ये पृथ्वीची अंतर्गत रचना, जलचक्र, मातीची धूप, सूर्य व चंद्रग्रहण, पर्यावरण व प्रदूषण, जलचक्र आणि सौरमंडळ अशा बऱ्याच प्रतिकृतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. प्रणाली रेडकर मॅडम आणि भूगोल विषय शिक्षक श्री. मनिष सावंत सर व श्रीम. प्रियंका शिरसाट मॅडम यांनी विद्यार्थ्यांना भूगोलाचे मानवी जीवनातील महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदल या विषयांवर मार्गदर्शन केले.
अनेक विद्यार्थ्यांनी भूगोलाशी संबंधित रंजक माहिती आणि मकर संक्रांतीचे भौगोलिक कारण यावर आपली मते मांडली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भूगोल विषयाची आवड निर्माण होण्यास मदत झाली. प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या प्रदर्शनात सहभागी झाले होते.







