ठळक घडामोडी

मायशाळेच्या अंगणात गुरुवंदना आणि ऋणानुबंधांचा अनोखा संगम!मळगाव इंग्लिश स्कूलचा भव्य माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात

मायशाळेच्या अंगणात गुरुवंदना आणि ऋणानुबंधांचा अनोखा संगम

मळगाव इंग्लिश स्कूलचा भव्य माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात

मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवारातर्फे स्नेहमेळाव्याचे आयोजन

सावंतवाडी : ज्या शाळेने विद्या दिली, आयुष्याचा पाया रचला गुरुजनांनी ज्ञानाचे धडे दिले, त्या मायशाळेच्या अंगणात पुन्हा एकदा आठवणींना उजाळा” असा भावस्पर्शी अनुभव देणारा मळगाव इंग्लिश स्कूलचा भव्य माजी विद्यार्थी स्नेहमेळावा काल रविवारी प्रशालेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला. गुरुवंदना आणि ऋणानुबंधांचा अनोखा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवारातर्फे या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

कार्यक्रमाची सुरुवात माजी विद्यार्थ्यांची नोंदणी आणि अल्पोपहाराने झाली. मुख्य सोहळ्याचा प्रारंभ ईशस्तवन आणि स्वागतपद्याने झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती देवीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर माजी शिक्षक जयप्रकाश प्रिओळकर, बी. एल. सामंत, माजी मुख्याध्यापक दिवाकर राऊळ, वैजनाथ देवण, प्रमिला राणे-सावंत, शशिकांत साळगावकर, बाळकृष्ण मुळीक, माजी शिक्षक सुनील कदम, संस्था खजिनदार नंदकिशोर राऊळ, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष मनोहर राऊळ, मुख्याध्यापक मारुती फाले, निवृत्त कर्मचारी विलास जाधव, काका बोन्द्रे, बाळा जाधव, विजया पंतवालावलकर तसेच माजी विद्यार्थी परिवाराचे अध्यक्ष शेखर पाडगावकर, उपाध्यक्ष प्रभाकर तेली, सचिव महेश गावकर, खजिनदार भाऊ देवळी, गुरुनाथ नार्वेकर, हेमंत खानोलकर, समीर परब, मनीषा नाटेकर आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक भाषणात माजी विद्यार्थी परिवाराचे उपाध्यक्ष प्रभाकर तेली यांनी मेळाव्यामागची भूमिका स्पष्ट केली, तर सचिव महेश गांवकर यांनी अहवाल सादरीकरणातून संस्थेच्या वाटचालीचा आणि प्रगतीचा आढावा घेतला.

या स्नेहमेळाव्याचे खास आकर्षण ठरले ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः” या भावनेतून आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या या सर्व गुरुजनांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.

​केवळ शिक्षकच नव्हे, तर शाळेच्या पहिल्या पिढीतील म्हणजेच वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या विविध क्षेत्रातील १० ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच एसएससी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अमिषा ओमप्रकाश तिवरेकर हिचा माजी सभापती रमेश गावकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी शिक्षक जयप्रकाश प्रियोळकर म्हणाले, वाचनाच्या दोन प्रमुख पद्धती आहेत मूकवाचन आणि प्रकट वाचन. प्रकट वाचन करताना वाचक मोठ्याने वाचन करतो, त्यामुळे घरातील इतर व्यक्तींना तो काय वाचत आहे हे सहजपणे कळते. प्रकट वाचन प्रभावी होण्यासाठी शब्दबोध अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर वाक्यबोध आणि अर्थबोध यांचीही योग्य समज असल्यास वाचन अधिक स्पष्ट, अचूक व परिणामकारक होते. मुलांच्या प्रकट वाचनातून त्यांची शब्दओळख, उच्चार, वाक्यरचना आणि अर्थसमज समजून येते. म्हणूनच पालकांनी मुलांच्या प्रकट वाचनाकडे विशेष लक्ष देणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि आवश्यक तेथे दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रिओळकर यांनी सांगितले. आजारापणामुळे घराबाहेर पडणे कठीण असताना केवळ विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण येथे आलो. यावेळी शाळेतील जुन्या आठवणी सांगताना सरांना अश्रू अनावर होत सर भावुक झाले होते. शाळेतील विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण मुळीक म्हणाले, “मी या शाळेचा विद्यार्थी आणि शिक्षकही राहिलो आहे. सध्या इमारतीचे नूतनीकरण सुरू असून, माजी विद्यार्थ्यांनी या कार्यात सढळ हाताने मदत करून शाळेचे वैभव जपावे, असे आवाहन केले.

माजी विद्यार्थी परिवाराचे अध्यक्ष शेखर पाडगावकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “प्रियोळकर सरांनी शिकवलेली प्रमेयं आजही आमच्या मनात कोरलेली आहेत. सरांच्या आशीर्वादासाठी लागलेली रांग हेच त्यांच्या शिकविण्याचे यश आहे. आम्ही ‘भरत’ होऊन प्रशालेच्या सेवेसाठी तत्पर आहोत. शाळेच्या नूतनीकरणाची जबाबदारी आम्ही पूर्ण करू, मात्र त्यासाठी सर्वांच्या साथीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा नाटेकर-राऊळ यांनी तर आभार समीर परब यांनी मानले.

स्नेहभोजन आणि पसायदानाने या अविस्मरणीय सोहळ्याची सांगता झाली. यावेळी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी परिवाराच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवारातर्फे आयोजित या स्नेहमेळाव्याने “काळ जरी पुढे गेला, तरी शाळेच्या आठवणी मनात अढळ राहतात” याचा प्रत्यय या स्नेहमेळाव्यात प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून येत होता. हा स्नेहमेळावा म्हणजे केवळ भेटीगाठी नव्हे, तर मायशाळेच्या संस्कारांची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा, नात्यांना नवसंजीवनी देणारा उत्सव ठरला. मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवाराने घेतलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यातही असेच उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.