ठळक घडामोडी

झाराप-पत्रादेवी मार्गावरील मळगाव सुतारवाडी येथील बायपास रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

झाराप-पत्रादेवी मार्गावरील मळगाव सुतारवाडी येथील बायपास रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था

सावंतवाडी :

झाराप-पत्रादेवी मार्गावरील मळगाव बॉक्सवेलकडून कुडाळच्या दिशेने जात असलेल्या सर्व्हीस रस्त्याला लागूनच असलेल्या सुतारवाडी येथून जात असलेला बायपास रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे अद्यापही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत जैसे थे स्थितीत आहे.
झाराप-पत्रादेवी मार्गावर मळगाव बॉक्सवेलकडून कुडाळच्या दिशेने जात असलेल्या सर्व्हीस रस्त्याला लागूनच हा बायपास रस्ता आहे. मुख्य महामार्गाचे काम पूर्ण होऊनही गेली कित्येक वर्ष या रस्त्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या रस्त्याची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली आहे. मात्र महामार्ग प्रशासन याकडे जाणून बुजून डोळेझाक करत आहे. वर्षानुवर्षे हा रस्ता थोडा थोडा खचत जाऊन सध्या तर हा रस्ता पूर्णतः वाहून गेल्याने येथे रस्ता होता की नाही ते सुद्धा सांगणे कठीण झाले आहे. सर्व्हीस रस्त्याला लागूनच या बायपास रस्त्यावर उताराच्या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच या रस्त्यावरील मातीही वाहून गेल्याने रस्त्यावर दगड धोंडेच शिल्लक राहिले आहेत. येथून वाहनच काय साधे चालणेही जिकरीचे बनले आहे. तर रात्रीच्या ठिकाणी येथून ये-जा करताना करताना येथील लोकांना अधिकच नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी एखादा मोठा अपघात झाल्यावर किंवा येथे एखादा निष्पाप बळी गेल्यावर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल येथील संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.


सुतारवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत हा रस्ता करण्यासंदर्भात वारंवार मागणी तसेच या रस्त्या संदर्भात दोन वेळा उपोषण सुद्धा केले. यावेळी लोकप्रतिनिधींनी हा रस्ता दुरुस्त करण्यासंदर्भात आश्वासन दिले, मात्र मात्र दिलेल्या आश्वासनाची पूर्ती मात्र केली नाही. तसेच सावंतवाडी, ओरोस येथीक सार्वजनिक बांधकाम विभागालाही रस्ता करण्यासंदर्भात येथील ग्रामस्थांनी पत्र दिले, मात्र तेथेही दिलेल्या आश्वासनाची पूर्ती झाली नाही. त्यामुळे संबंधित प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही येथील ग्रामस्थांनी केला आहे. मुख्य महामार्गाचे काम झाल्यापासून येथील लोकांच्या सोयीसाठी हा रस्ता करून देण्याचे महामार्ग प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र तेव्हापासून महामार्ग प्रशासनाचा तसेच लोकप्रतिनिधींचा या रस्त्याकडे दुर्लक्षच होत असल्याने सद्यस्थितीत या रस्त्याची अतिशय बिकट अशी अवस्था झाली आहे. हा बायपास रस्ता मुख्य महामार्गाला लागून असलेल्या सर्व्हीस रोडला लागूनच आहे. पावसाच्या दिवसात तर महामार्गावरील सर्व पाणी या रस्त्यावर येत असल्याने पावसाळ्यात तर या डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र आता तरी महामार्ग प्रशासनाने येथील लोकांचा विचार करून आता तरी हा रस्ता डांबरीकरण करून द्यावा, अशी मागणी सुतारवाडी ग्रामस्थांनी केली आहे.