सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा आमदार दीपक केसरकर यांच्याकडून सत्कार…
सावंतवाडी :
सावंतवाडीचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करत त्यांचा विशेष गौरव केला. येथील श्रीधर अपार्टमेंट येथे हा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी आमदार केसरकर यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना त्यांच्या आगामी कारकिर्दीसाठी आणि शहराच्या विकासाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, दुर्गेश उर्फ देव्या सुर्याजी आणि अजय गोंदावळे या नवनिर्वाचित नगरसेवकांचा केसरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित नगरसेविका ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक आणि शर्वरी धारगळकर यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना दीपक केसरकर यांनी, जनतेने दिलेला कौल सार्थ ठरवण्यासाठी आणि शहराच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी दत्ता सावंत, संजय पेडणेकर आणि दिपाली सावंत यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी आपल्या कामातून सावंतवाडी शहराचा चेहरामोहरा बदलावा आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशा भावना यावेळेस व्यक्त करण्यात आल्या.







