वेंगुर्ला तालुक्यात गव्यांचा धुमाकूळ; होडावडे येथे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला, शेतकरी हवालदिल!
वेंगुर्ला (प्रतिनिधी):
सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यात सध्या जंगली गव्यांनी मोठ्या प्रमाणात हैदोस घातला असून, शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे-परबवाडी परिसरात गव्यांच्या कळपाने शेतीचे अतोनात नुकसान केले असून, वनविभागाच्या सुस्त कारभाराबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पाच एकरातील पिकांचा फन्ना
होडावडे गावातील परबवाडी येथे गव्यांच्या १० ते १२ पेक्षा जास्त असलेल्या कळपाने गेल्या काही दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे. शेतकऱ्यांनी अत्यंत मेहनतीने लावलेली मिरची, चवळी, नाचणी आणि इतर पिके गव्यांनी पूर्णपणे फस्त केली आहेत. सुमारे ४ ते ५ एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून, समीर परब या नुकसानग्रस्त शेतकऱ्याने ही व्यथा मांडली आहे.
या शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान:
परबवाडीतील सामूहिक शेतीवर गव्यांनी डल्ला मारल्याने खालील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे: यात समीर परब, ,महेश परब,रूपल परब, परेश नाईक, यशवंत परब, रमेश साळगावकर,काका बिबवणेकर
या सर्व शेतकऱ्यांची मिळून सुमारे साडेतीन ते चार एकर जमिनीवरील पिके गव्यांनी एका रात्रीत उद्ध्वस्त केली आहेत.
“रात्रंदिवस मेहनत करून आम्ही पिके उभी केली, पण गव्यांच्या कळपामुळे डोळ्यांदेखत शेतीचे नुकसान होत आहे. आता शेती करावी की नको, असा प्रश्न आमच्यासमोर उभा ठाकला आहे. वनखाते याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.”
— समीर परब (नुकसानग्रस्त शेतकरी)
एकीकडे सरकार शेतीसाठी प्रोत्साहन देत असताना, दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी शेती सोडून देण्याच्या मानसिकतेत आहे. गव्यांचा कळप मोठा असल्याने शेतात शिरल्यावर तो पूर्ण पीक मातीमोल करतो. इतकी गंभीर परिस्थिती असतानाही वनविभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना किंवा प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आता वनखाते या गव्यांचा बंदोबस्त करणार की शेतकरी असाच वाऱ्यावर राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.








