कणकवली:
“महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त, गांजा-ड्रग्ज मुक्त आणि गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवस-रात्र एक करत आहेत. त्यांच्या या प्रामाणिक कार्याला गालबोट लावण्याचे हे काम माजी आमदार वैभव नाईक यांनी करू नये,” असा टोला राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. कणकवली येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी वैभव नाईक यांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला.
गुन्हेगारांवर मुख्यमंत्र्यांचा वचक
माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही आरोप केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले:
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधीही कोणत्या गुन्हेगाराला साथ दिलेली नाही किंवा कोणाला पाठीशी घातलेले नाही. आज राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. कोणताही गुन्हा घडला, तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि आपली सुटका होणार नाही, याची पूर्ण जाणीव गुन्हेगारांना आहे. तशी भीतीच राज्यातील गुन्हेगारांमध्ये निर्माण झाली आहे.”
चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
गृह खात्यातील काही अधिकारी चुकीचे काम करत असले, तरी त्यावर मुख्यमंत्र्यांचे बारीक लक्ष असते, असे सांगत नितेश राणे पुढे म्हणाले, “आमदार आणि मंत्री म्हणून आम्ही स्वतः असंख्य वेळा पाहिले आहे की, गृह खात्यातील निकृष्ट किंवा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी जागेवर सस्पेंड केले आहे आणि कडक शिक्षा दिली आहे.”
पोलीस अधीक्षकांवरील आरोपांची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार
आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्गच्या पोलीस अधीक्षकांवर केलेल्या आरोपांचा संदर्भ देत पालकमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. “पोलीस अधीक्षकांवर जे आरोप झाले आहेत, त्याबाबतची सर्व माहिती आम्ही सरकार म्हणून निश्चितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. प्रशासन किंवा खात्यात कुठेही चूक झाली असेल, तर सरकार म्हणून आम्ही कोणालाही सोडणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
(सोबत फोटो)








