ठळक घडामोडी

आडाळी एमआयडीसीत अवैध खनिज उत्खनन; ठाकरे शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

कुडाळ
तालुक्यातील आडाळी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध खनिज उत्खनन सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. स्थानिक प्रशासन या गंभीर प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, ठाकरेंच्या शिवसेनेने याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ आणि दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने कुडाळ येथील उपविभागीय अधिकारी तथा एमआयडीसी कार्यालयाला धडक देत एक निवेदन सादर केले.

शिवसेनेने दिलेल्या निवेदनात प्रशासकीय अनास्थेवर तीव्र बोट ठेवले आहे. दोडामार्ग तालुक्यात स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा आणि उद्योगधंद्यांना चालना मिळावी या उद्देशाने अनेक वर्षांपूर्वी आडाळी येथे एमआयडीसीची स्थापना करण्यात आली होती. मात्र, आजतागायत या परिसरात अपेक्षेप्रमाणे कोणतेही मोठे उद्योगधंदे उभे राहिलेले नाहीत.
उद्योगांऐवजी सध्या या परिसरात जमिनीच्या सपाटीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात खनिजयुक्त माती आणि इतर मौल्यवान खनिजांचे उत्खनन केले जात आहे. कोणतीही अधिकृत परवानगी किंवा कायदेशीर कागदपत्रे नसताना हे खनिज बाहेर नेऊन बेकायदेशीरपणे विकले जात असल्याचा थेट आरोप शिवसैनिकांनी केला आहे.

या अवैध उत्खननाबाबत यापूर्वीही अनेकवेळा प्रशासनाशी संपर्क साधून माहिती देण्यात आली होती. मात्र, अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणाची आता सखोल चौकशी करून तात्काळ पंचनामा करण्यात यावा, तसेच संपूर्ण परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून अवैध उत्खनन रोखावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

हे निवेदन सादर करताना सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, दोडामार्ग तालुकाध्यक्ष संजय गवस यांच्यासह सावंतवाडी तालुकाध्यक्ष राजेश शेटकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, लक्ष्मण आयनोडकर, उप तालुका अध्यक्ष संदेश सावंत, विजय जाधव, प्रेमानंद नाईक, विनोद काजरेकर, प्रमोद सावंत, गोविंद केरकर, सुनील गावडे, गुरूनाथ नाईक, प्रशांत बुगडे, मंदार नाईक, विनोद ठाकूर, सोमनाथ गवस, भिवा गवस, संजीव पेडणेकर, गोकुळदास मोठे, विष्णू नाईक यांसह उबाठा सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“आमदार महेश सावंत आणि माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच आडाळी एमआयडीसी परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या अवैध उत्खननाला पाठीशी घालणाऱ्या आणि संरक्षण देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात जोरदार आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल.”
– शिवसेना (उबाठा) पदाधिकारी

यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, दोडामार्ग तालुकाध्यक्ष संजय गवस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष राजेश शेटकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, लक्ष्मण आयनोडकर, उप तालुका अध्यक्ष संदेश सावंत, विजय जाधव, प्रेमानंद नाईक, प्रेमानंद नाईक, विनोद काजरेकर, प्रमोद सावंत, गोविंद केरकर, सुनील गावडे, गुरूनाथ नाईक, प्रशांत बुगडे, मंदार नाईक, विनोद ठाकूर, सोमनाथ गवस, भिवा गवस, संजीव पेडणेकर, गोकुळदास मोठे, विष्णू नाईक यांसह उबाठा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.