ठळक घडामोडी

सावंतवाडीत राजकीय राडा: १०० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल

सावंतवाडीत राजकीय राडा: १०० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल!

सावंतवाडी, ता. ०३:

सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख असलेल्या शांत सावंतवाडीत मतदानाच्या पार्श्वभूमीवर अभूतपूर्व राजकीय राडा झाल्याने शहर अशांत बनले आहे. गाडी अंगावर घातल्याच्या कारणावरून शिवसेना आणि भाजपचे गट थेट रस्त्यावर भिडले. सावंतवाडीच्या इतिहासात प्रथमच अशी मोठी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.


या राडाप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात १०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेत दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत, तसेच बेकायदा जमाव जमवल्याबद्दलही गुन्हा नोंदवण्यात आला आहे: पहिल्या तक्रारीत (शिवसेना गट): गुन्हा दाखल: शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, अजय गोंदवळे, नगराध्यक्ष उमेदवार नीता कविटकर, क्लेटस फर्नांडिस, ज्ञानेश्वर पाटकर, प्रफुल्ल गोंदवळे यांच्यासह २० ते २५ जणांचा समावेश. दुसऱ्या तक्रारीत (भाजप गट): गुन्हा दाखल: भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा चालक अमरेश यादव, ॲड. अनिल निरवडेकर, विनोद राऊळ यांच्यासह २० ते २५ जणांचा समावेश. बेकायदा जमाव: गुन्हा दाखल: ज्ञानेश्वर पाटकर, क्लेटस फर्नांडिस, अमित परब यांच्यासह ४० ते ५० अज्ञात व्यक्तींवर बेकायदा जमाव जमवल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल मंगळवार २डिसेंबर रोजी सावंतवाडी येथील फॉरेस्ट ऑफिस कार्यालयाच्या परिसरात ही घटना घडली. ‘गाडी अंगावर घातल्या’च्या रागातून शिवसेना आणि भाजपचे दोन गट अचानक एकमेकांना भिडले. यावेळी भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा चालक अमरेश यादव (रा. चराठे) याला मारहाण करण्यात आली आणि त्याची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा तणाव तब्बल दीड ते दोन तास त्या ठिकाणी सुरू होता. शहराच्या शांततेला गालबोट लागले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मात्र, त्यानंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.या घटनेमुळे सावंतवाडीत तणावाचे वातावरण असून, निवडणुकीच्या धामधुमीत शांतता राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली आहे.