ठळक घडामोडी

सहा वर्षांनंतर सावंतवाडीला राजधानी एक्स्प्रेसचा पुन्हा थांबा; कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत

सहा वर्षांनंतर सावंतवाडीला राजधानी एक्स्प्रेसचा पुन्हा थांबा; कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत

सावंतवाडी :

सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकाला राजधानी एक्स्प्रेसचा थांबा पुन्हा मिळाल्यानंतर गुरुवारी प्रथमच ही रेल्वे स्थानकात दाखल झाली. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने राजधानी एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रेल्वे स्थानक परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून प्रवासी, रेल्वेप्रेमी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा क्षण उत्साहात साजरा केला.
सकाळी सुमारे ९.३० वाजता राजधानी एक्स्प्रेस सावंतवाडी रेल्वे स्थानकात दाखल होताच रेल्वेचे विधिवत पूजन करण्यात आले. पुष्पहार अर्पण करून रेल्वेचे स्वागत करण्यात आले, तसेच रेल्वेच्या दोन्ही चालकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांना पेढे वाटून या ऐतिहासिक यशाचा आनंद साजरा करण्यात आला.
कोरोना काळात राजधानी एक्स्प्रेस आणि गरीबरथ एक्स्प्रेसचा सावंतवाडीतील थांबा बंद करण्यात आला होता. त्यानंतर कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने सातत्याने पाठपुरावा करत रेल्वे प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांकडे मागणी लावून धरली. या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून राजधानी एक्स्प्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस तसेच मंगळुरू एक्स्प्रेसचे थांबे पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.
या यशामागे मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी सांगितले. तसेच सावंतवाडी रेल्वे स्थानकाला लोकनेते मधू दंडवते यांचे नाव देण्यात आले असून, त्यांच्या कार्याला साजेशी प्रवासी-केंद्रित सेवा आणि विकास या स्थानकातून घडावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.याप्रसंगी उपाध्यक्ष सागर तवळडेकर, ज्येष्ठ सल्लागार सुभाष शिरसाट, खजिनदार भूषण बांदिवडेकर, सिद्धेश सावंत, मिहीर गावडे, यश सावंत, संकेत सावंत, सरिता सावंत, प्रेरणा पोखळे, निधी धुरी, करण धुरी, श्री. तानावडे, रिक्षा व्यावसायिक तसेच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि मळगाव येथील विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजधानी एक्स्प्रेसचा थांबा पुन्हा सुरू झाल्याने सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, भविष्यात आणखी महत्त्वाच्या रेल्वे सेवांचा लाभ या स्थानकाला मिळावा, अशी अपेक्षा प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.