ठळक घडामोडी

दक्षिण कोकणचा ‘स्वर्ग’ अवतरला! मुसळधार पावसाने आंबोली घाट नटला; पहिल्याच रविवारी पर्यटकांचा महापूर! गोवा, कर्नाटकसह सिंधुदुर्गातील पर्यटकांची आंबोलीtत तुडुंब गर्दी,

आंबोली:
मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे दक्षिण कोकणचे स्वर्ग मानल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाला अखेर निसर्गाचे हिरवेगार रूप बहाल झाले आहे. येथील विहंगम आणि अथांग धबधबे आता पूर्ण ताकदीने ओसंडून वाहू लागले आहेत. पावसाळ्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या पर्वतरांगांमधील जलप्रपात सुरू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच, आज पावसाच्या पहिल्याच रविवारी पर्यटकांनी आंबोलीकडे कूच केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह लगतच्या गोवा आणि कर्नाटक राज्यातील पर्यटकांच्या अलोट गर्दीमुळे अवघा आंबोली घाट पर्यटकांच्या उत्साहाने आणि निसर्गाच्या नादाने दुमदुमून गेला होता.


उंच कड्यांवरून फेसाळत आणि दुधासारखे पांढरे शुभ्र रूप घेऊन जमिनीच्या दिशेने झेपावणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी पर्यटकांमध्ये अभूतपूर्व चुरस पाहायला मिळाली. मुख्य धबधब्याच्या अगदी मुळाशी जाऊन निसर्गाच्या या रौद्र आणि देखण्या रूपाचा आनंद लुटण्यात पुरुषांच्या बरोबरीने महिला आणि चिमुरडेही आघाडीवर होते,या थरारक आणि आल्हाददायक क्षणांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी तरुण-तरुणींमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली. धबधब्यांच्या पार्श्वभूमीवर फोटो, व्हिडिओ आणि सोशल मीडिया रिल्स बनवण्याची जणू स्पर्धाच लागली होती.

मुख्य धबधब्यासोबतच परिसरातील प्रसिद्ध कावळे साद पॉईंट आणि घाटमार्गातील लहान-मोठ्या जलप्रपातांवर पर्यटकांनी सचैल स्नानाचा (पाण्यात भिजण्याचा) मनमुराद आनंद लुटला. मुख्य धबधब्यावरील प्रचंड गर्दी टाळण्यासाठी काही निसर्गप्रेमी कुटुंबांनी एक वेगळी वाट निवडली. त्यांनी चौकुळ, महादेवगड आणि परिसरातील अंतर्गत भागातील शांत, निसर्गरम्य धबधब्यांचा शोध घेऊन आपला वीकेंड अत्यंत शांततेत साजरा केला. या सर्व पर्यटन ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.