सावंतवाडी : सावंतवाडी एसटी बसस्थानकाचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे, शिल्लक १५ नवीन एसटी बसेस गणेशोत्सवापूर्वी सावंतवाडीला उपलब्ध करून द्याव्यात तसेच सावंतवाडी-बेळगावमार्गे बेंगळुरू आंतरराज्य दैनंदिन बससेवा तातडीने सुरू करावी, अशी आग्रही मागणी आमदार दीपक केसरकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली.
आमदार दीपक केसरकर यांनी आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन सावंतवाडी मतदारसंघातील एसटी सेवेबाबतच्या विविध समस्यांवर चर्चा केली. सावंतवाडी एसटी बस डेपोचे बांधकाम बीओटी तत्त्वावर मंजूर झाले असून, प्रशासनाकडून याबाबत दिरंगाई होत असल्याचे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. बसस्थानकाचे काम तातडीने मार्गी लागण्यासाठी संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या आठवड्यात सावंतवाडीला एसटीच्या पाच नवीन बसेस प्राप्त झाल्या आहेत. त्याबद्दल केसरकर यांनी परिवहन मंत्र्यांचे आभार मानले. मात्र, शिल्लक असलेल्या १५ बसेस गणेशोत्सवापूर्वी उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंतीही त्यांनी केली.
बेंगळुरूसाठी थेट एसटी बससेवेची मागणी
सावंतवाडी परिसरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नागरिक, विद्यार्थी तसेच नोकरी-व्यवसायानिमित्त बेंगळुरू व परिसरात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सध्या या प्रवाशांना बेंगळुरूला जाण्यासाठी बेळगाव अथवा पणजी-मडगावमार्गे प्रवास करावा लागत असल्याने त्यांचा वेळ व पैसा खर्च होतो.
त्यामुळे सावंतवाडी-बेळगावमार्गे बेंगळुरू अशी आंतरराज्य दैनंदिन एसटी बससेवा सुरू केल्यास प्रवाशांना मोठा फायदा होईल, असे केसरकर यांनी सांगितले. या मार्गावर बेंगळुरू, तुमकूर, चित्रदुर्ग, दावणगेरे, हावेरी, हुबळी, धारवाड आणि बेळगाव या भागांतील प्रवाशांची मोठी ये-जा आहे. तसेच सिंधुदुर्गातील आंबोली हे महत्त्वाचे पर्यटनस्थळही या मार्गावर असल्याने या बससेवेला चांगला प्रतिसाद व भारमान मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.
सावंतवाडी ते बेंगळुरू व परत अशी आंतरराज्य दैनंदिन बससेवा सुरू करण्याची आग्रही मागणी आमदार दीपक केसरकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली. या तिन्ही मागण्यांना मंत्री सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती केसरकर यांच्या वतीने देण्यात आली.







