

कल्पकता आणि आनंदाची उंच भरारी; प्रशालेत पतंग बनवणे व उडवणे स्पर्धा उत्साहात संपन्न.
निरवडे प्रतिनिधि
संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे ‘पतंग महोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला. संस्कार नॅशनल स्कूलमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने ‘पतंग बनवणे आणि पतंग उडवणे’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने तयार केलेल्या रंगीबेरंगी पतंगांनी निरवडेचे आकाश उजळून निघाले होते.
सदर स्पर्धेचे दोन मुख्य विभाग होते.विद्यार्थ्यांनी कागद, बांबूच्या काड्या आणि घरगुती साहित्याचा वापर करून पर्यावरणपूरक पतंग तयार केले. यामध्ये काहींनी सामाजिक संदेश देणारे पतंग बनवले होते.सदर स्पर्धेचे परीक्षण प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणाली रेडकर मॅडम व कला शिक्षक श्री. योगेश येरम सर यांनी केले. शाळेच्या मैदानात सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत पतंग उडवण्याचा आनंद घेतला. “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणाली रेडकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीचे महत्त्व आणि पतंग उडवण्यामागचे वैज्ञानिक कारण समजावून सांगितले. तसेच, पतंग उडवताना पक्ष्यांना इजा होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
उत्कृष्ट पतंग बनवणाऱ्या आणि तंत्रशुद्ध पद्धतीने पतंग उडवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रशालेतील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.







