आजगावात तणाव: जेएसडब्ल्यू मायनिंग सर्वेक्षणावरून ग्रामस्थांवर गुन्हे दाखल; शिवसेनेचा तीव्र निषेध
सावंतवाडी:
आजगाव येथे जेएसडब्ल्यू (JSW) मायनिंग सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये सुसंवाद घडून आलेला असतानाच, पोलिसांनी ग्रामस्थांवर थेट अजामीनपात्र गुन्हे दाखल केल्यामुळे परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या अन्यायकारक कारवाईविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आजगाव येथे संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी कोणताही अनुचित प्रकार न करता अत्यंत सामंजस्याने पोलिसांच्या स्वाधीन केले होते. संबधित कर्मचाऱ्यांनीही आपल्याला कोणतीही मारहाण अथवा त्रास झालेला नसल्याचा स्पष्ट जबाब पोलिसांना दिला होता. असे असतानाही सावंतवाडी पोलिस ठाण्यात ग्रामस्थांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.
शिवसेनेचा ग्रामस्थांना जाहीर पाठिंबा
या संपूर्ण प्रकारावर शिवसेना नेते संजू परब यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पोलिसांच्या या कारवाईवर कडाडून टीका केली.
“आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांनी आपल्या हक्कांसाठी आणि परिसराच्या हितासाठी शांततापूर्ण मार्गाने आवाज उठविला आहे. असे असतानाही त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे अत्यंत अन्यायकारक आहेत. शिवसेना या दडपशाहीविरोधात ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.”
— **संजू परब (शिवसेना नेते)
पालकमंत्र्यांचेही मिळणार बळ
संजू परब यांनी पुढे सांगितले की, या गंभीर विषया संदर्भात त्यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. पालकमंत्र्यांनीही या प्रकरणात लक्ष घालत ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर आणि राजकीय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी आयोजित बैठकीला शिवसेनेचे आणि स्थानिक संघर्ष समितीचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये झेव्हिअर फर्नांडिस (शिवसेना उपजिल्हाप्रमुख)क्लॅट्स फर्नांडिस (युवासेना तालुकाप्रमुख ॲड. स्वप्नीलप्रभूआजगावकर,हेमंत मराठे(मळेवाड उपसरपंच)श्री. नातू (अध्यक्ष, संघर्ष समिती)यांच्यासह राजेश आजगावकर, प्रशांत काकतकर, अमित प्रभू, सचिन प्रभू, आबा चीपकर, नील प्रभूझांट्ये आणि आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कारवाईमुळे आजगाव परिसरात सध्या कमालीचे शांततेचे पण तणावाचे वातावरण असून, ग्रामस्थ आरपारच्या लढाईच्या तयारीत आहेत.







